07/04/2024
# # ३) सुसू बेटी # #
दिवाळीचे थंडगार प्रसन्न दिवस होते ते...! सगळीकडे धामधूम सुरू होती. गल्लीमध्ये रंगीबेरंगी कागदी आकाशकंदील चमकत होते. मधेमधे कुठे लवंगी फटाके वाजत होते तर कुठे कुंड्या तर कुठे भुईचक्कर .... एका घरात मात्र वेगळीच लगबग होती. कारण लवकरच कोणीतरी नवीन पाहुणा घरात येणार होता. दिवाळी तशी नेहमीसारखीच जात होती. घरातील दोघेही भाऊ मात्र जरा एका गोष्टी पासून अनभिज्ञ होते. पण आजोळच्या लोकांची नशिराबादहून जी येवजाव चालू होती त्यावरून लवकरच काहीतरी घडणार, याची त्यांना जाणीव होत होती.
बघताबघता दिवाळी गेली. हळूहळू वातावरण पहिल्यासारखे होत होते. पण कार्तिक महिन्यातल्या काकड आरत्या रोज पहाटे चालूच होत्या. कठीण परिस्थितीत सुद्धा ही बाई आरती चुकवत नव्हती. पोटातल्या बाळाच्या हालचाली मध्ये मध्ये वाढत होत्या. तसे लवकरच ती वेळ जवळ येतीये याची तिला जाणीव झाली होती. अगोदरच्या पाच डिलीवरींमुळे तशी ती हुशार झालेली होती. पण त्यातले दोनच जण सध्या अस्तित्वात होते. मोठ्या तिघांचे कोणत्या न कोणत्या आजाराने आणि काही कारणाने देहावसान झाले होते. पण त्या काळात उपलब्ध मोजकी वैद्यकीय सेवा आणि आजारांची कमी जाण असल्याने त्या घटना घरोघरी सारख्याच होत्या. दोघा नवरा-बायकोला एकाच विचाराने भावनिक बनविले होते. अगोदरची दोन्ही मुलेच असल्याने आणि त्या अगोदरची मोठी मुलगी कौमुदिनी ही आजाराने बालपणातच मरण पावलेली असल्याने दोघांना या वेळेला तरी मुलगीच हवी होती. आणि त्यानंतरच पाळणा थांबवावा हा भोळा विचार ही मनात होता...! सामान्य आर्थिक परिस्थितीच्या त्या काळातही मुलगी पाहिजेच हा विचार किती थोर आणि महान होता ना...! असो... पण नियतीला कदाचित ते मान्य नसावे किंवा काहीतरी वेगळा विचार तिच्या मनात असावा....
तारीख जवळ आली तसे तिने नशिराबादच्या आपल्या वहिनीला बोलावणे पाठविले कारण दवाखान्यात गेल्यानंतर घरी कोणीतरी असणे गरजेचे होते. शिवाय घरातील तिघांचे जेवणखावण बघणेही तितकेच महत्वाचे होते. आणि बाळंतिण बाईचे सर्व सोपस्कार करणे अजून वेगळेच आणि अति महत्वाचे...! अखेर ती वेळ आली. प्रसववेदना चालू झाल्याने ५ तारखेला रात्रीच त्या बाईला पुन्हा डॉ. सुमन सदाशिव आठवलेंच्याच हॉस्पिटलला अॅडमिट केले गेले.( कारण अगोदर पासूनची श्रद्धा ) दुसर्याश दिवशी कार्तिकी एकादशी असल्याने आणि जळगावात पारंपारिक रथोत्सव असल्याने सगळीकडे गर्दी होणार होती. त्या बाईचा आनंद गगनात मावत नव्हता कारण नवीन बाळाने कार्तिक एकादशीचा मुहूर्त निवडलेला होता...! मंगळवारचा तो दिवस उजाडला. रथोत्सव असल्याने गावात लगबग सुरूच होती. सकाळी सकाळी प्रसववेदना तीव्र होऊ लागल्या. अखेर ८ वाजून ४५ मिनिटांनी त्या बालकाने नैसर्गिक मार्गाने जन्म घेतला. होय, बालकानेच... बालिकेने नव्हे...! दोघांचा पुन्हा हिरेमोड झाला. पण बालकाला बघून सगळं बाजूला राहिलं. चांगले ३ किलोचे गुटगुटीत गोंडस बाळ बघून ते सर्व विसरून गेले. देवाला जे मान्य तेच आपल्याला- अशी दोघांची मनोमन धारणा झाली....
बघायला येणार्याद बायका जसे जसे त्या बालकाला हातात घेत होत्या तसे तसे त्या सर्व वेगवेगळी नावे घेवू लागल्या. कोणी म्हणे कार्तिक एकादशीला कार्तिक जन्माला आलाय.... तर कोणी म्हणे एकादशीला एकनाथ जन्माला आलाय.... शेवटी कोणीतरी प्रेमाने बोलले सुशिलेच्या पोटी सुशील जन्माला आलाय !! झाले.... त्या आईला तेच आवडले आणि अशाप्रकारे त्याचे नामकरण सुशिलेचा सुशील असेच झाले......! सुदैवाने त्या दिवशी मंगळवार होता हे कोणाच्या लक्षात आले नाही, नाहीतर (‘डाकू’) ‘मंगल’ नामकरण होऊ शकले असते...! तुम्हां सर्वांना आता लक्षात आले असेलच की हा सगळा जन्मसोहळा माझाच होता...! ६ नोव्हेंबर १९७३ च्या मंगलदिनी – पवित्र कार्तिक एकादशीला - माझा जन्म झाला.
या सगळ्या कथा-प्रपंचाचा उद्देश फार आगळावेगळा आहे. माझी आई तशीच होती जशी प्रत्येकाची असते. पण ती अशिक्षित असूनही काही बाबतीत तिचे विचार उच्च शिक्षणा पलीकडचे होते. तिच्या जवळच्या सर्व बायका तिला प्रेमाने ‘सुशे’ म्हणायच्यात. मुलीची तीव्र इच्छा तिच्या मनातून काही केल्या जात नव्हती. त्यामुळेच की काय ती मला ‘सुसू बेटी’ बोलावू लागली. आपण मुलीला मोठे करतांना तिला बेटा म्हणतो. त्यामागे तिला बाहेरच्या जगात मुलांसारखे कणखर बनवण्याचा उद्देश असावा. पण मुलाला बेटी म्हणणारी माझ्या माहितीतील कदाचित ती एकमेव आई असावी. त्यामुळेच की काय मी मनाने खूप हळवा राहिलो असेन. लहानपणी सर्व मित्रांमध्ये ही हाक खूपच आवडीची झाली आणि त्यामुळे त्या हाकेचा प्रभाव असा होता की आम्ही सर्व लहान मोठे मित्र सुद्धा एकमेकांना ‘बेटी’ म्हणत असू...! “बेटी” या शब्दाचा इतका ग्लोबल वापर कुठेच झाला नसावा. तिची ही हाक तिने अगदी तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही....अगदी हॉस्पिटल मध्ये सुद्धा !!
आई ... हा फक्त शब्द नाही तर एक व्याप्ती आहे !! आई ... हे जगातील सर्वात संवेदनशील नाते आहे. तिच्या सहवासात असतांना मनाच्या कोऱ्या पाटीवर त्या काळात उमटलेली अक्षरे आपल्या भाव-भावनांना, विचारांना योग्य दिशा देत असतात. एखादं शिल्प घडावं तसे आपण तिच्या सहवासात घडत असतो.... असाच काहीसा मी पण घडलोय !! कुटुंबासाठी निरंतर झटणारी, दिवसरात्र एक करणारी, सतत माझे लाड पुरवणारी आणि माझ्या प्रत्येक गोष्टीवर व कार्यावर प्रचंड विश्वास ठेवणारी माझी प्रेमळ आई आता या जगात नाही, पण "सुसू बेटी" हे शब्द ऐकायला आता माझे कान सतत तरसतात ....
माझ्या आयुष्यातली ही लिखाण मालिका सुरू करताना ती माझ्या जन्मापासूनच सुरू व्हावी अशी माझी इच्छा होती. या सर्वसाधारण घटनेतून समोर येणारी अतिशय बोधपूर्ण गोष्ट कदाचित इतरांसाठी एक प्रेरणा ठरू शकते असे मला प्रकर्षाने वाटते.... शिवाय माझ्या लेखनामध्ये मी त्या प्रत्येक छोट्याछोट्या गोष्टीला महत्व देणार आहे ज्या गोष्टींनी मी घडलो किंवा माझ्यात आमुलाग्र बदल झालेत किंवा मी इतरांमध्ये बदल घडविण्यास कारणीभूत ठरलो. ज्या गोष्टींमुळे माझ्या जीवनावर विशेष प्रभाव पडला त्या माझ्यासाठी सर्वात महत्वाच्या...! आई - तुझे अस्तित्व तुझ्या संस्कारातून निरंतर जाणवत राहिल याची मी नक्कीच काळजी घेईन .... अशा माझ्या प्रेमळ आईस कोटी कोटी श्रद्धांजली !!!
धन्यवाद !!
SKR - डॉ. सुशीलकुमार राणे (जळगाव) ९८२३११६०४४